(रत्नागिरी /प्रतिनिधी)
‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तीचा प्रत्यय यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील वाहन बाजारात आला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वाहन घरी आणण्याचा उत्साह नागरिकांमध्ये दिसून आला असून, अवघ्या नऊ दिवसांत जिल्ह्यात १ हजार १४९ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. दुचाकींची सर्वाधिक खरेदी झाली असून, पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठीही वाहनधारकांनी मुक्तहस्ते खर्च केला. वाहन नोंदणी आणि फॅन्सी क्रमांक शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एकूण ५ कोटी ६ लाख ९४ हजार १६६ रुपयांचा महसूल मिळाला आहे.
भारतीय संस्कृतीत दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी सोने-चांदी, मालमत्ता आणि मौल्यवान वस्तूंच्या खरेदीबरोबरच नवीन वाहन घरी आणण्याला अनेक कुटुंबे प्राधान्य देतात. यंदाही या परंपरेचे प्रतिबिंब रत्नागिरीतील वाहन बाजारात उमटले. दसऱ्याच्या दिवशी वाहनाची पूजा करून ते घराच्या अंगणात उभे करण्यासाठी अनेक ग्राहकांनी आधीच वाहनांचे बुकिंग केले होते. त्यामुळे वाहन विक्रीच्या शोरूममध्येही लगबग पाहायला मिळाली. दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीची मोठी धावपळ सुरू होती. या नऊ दिवसांत नोंदणी झालेल्या १ हजार १४९ वाहनांमध्ये ८६१ दुचाकी, १९६ चारचाकी कार, ४५ मालवाहतूक वाहने, २६ रिक्षा, १० रिक्षा-टेंपो, चार डंपर आणि अन्य सात वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणीतून परिवहन विभागाला ४ कोटी ८१ लाख ६ हजार १६६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
नवीन वाहन खरेदीपुरताच ग्राहकांचा उत्साह मर्यादित राहिला नाही, तर वाहनाला आकर्षक आणि पसंतीचा क्रमांक मिळवण्याकडेही अनेकांचा कल दिसून आला. विशेष क्रमांकासाठी २६८ वाहनधारकांनी तब्बल २५ लाख ८८ हजार रुपये अतिरिक्त शुल्क भरले. त्यामुळे नियमित वाहन नोंदणी शुल्क आणि फॅन्सी क्रमांक शुल्क मिळून परिवहन कार्यालयाच्या महसुलाने पाच कोटींचा टप्पा ओलांडला.
काही ग्राहकांना पसंतीच्या वाहनासाठी प्रतीक्षा करावी लागल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घरी आणण्याचे नियोजन पुढे ढकलावे लागले. तरीही नऊ दिवसांतील वाहन नोंदणीचा आकडा जिल्ह्यातील वाहन बाजारातील उत्साह अधोरेखित करणारा ठरला आहे. सणासुदीचा मुहूर्त, वाहन खरेदीची परंपरा आणि पसंतीच्या क्रमांकांची हौस यामुळे यंदा दसऱ्याच्या काळात वाहन बाजारात चांगलीच तेजी दिसून आली.


