(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दिव्यांग बांधवांना तपासणी, प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांच्या लाभांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात तालुकास्तरावर विशेष दिव्यांग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत आठ ठिकाणी ही शिबिरे होणार असून, संबंधित तालुक्यांतील गरजू दिव्यांगांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना तपासणीसाठी जिल्हा मुख्यालयापर्यंत प्रवास करावा लागू नये आणि स्थानिक पातळीवरच आवश्यक वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तपासणीच्या माध्यमातून दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया तसेच पात्रतेनुसार विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होण्यास मदत होणार आहे.
आठ ठिकाणी शिबिरांचे नियोजन
– १९ नोव्हेंबर : उपजिल्हा रुग्णालय, दापोली
– २६ नोव्हेंबर : उपजिल्हा रुग्णालय, कामथे
– ३० नोव्हेंबर : ग्रामीण रुग्णालय, देवरुख
– ३ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, लांजा
– ८ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, मंडणगड
– १४ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, गुहागर
– १७ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, राजापूर
– २२ डिसेंबर : उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी
दिव्यांग व्यक्तींना आवश्यक वैद्यकीय सुविधा अधिक सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील दिव्यांग बांधवांनी नियोजित तारखेला शिबिरस्थळी उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.


