(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मागील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी गणेश शाहीर मोरे याला तांत्रिक मदतीने शोधून ताब्यात घेण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ११९/२३ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३५३, ४६७, ४६८, १२० (ब) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ आणि २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे घटनास्थळ कोंडये येथील ब्रिज होते. या प्रकरणात पुण्यातील एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या गुन्ह्यातील आरोपी गणेश शाहीर मोरे (रा. वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता; मात्र तो मिळून येत नव्हता. फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनांनुसार राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, दीपक काळे आणि सागर कातकर हे तपासासाठी रवाना झाले. पथकाने तांत्रिक मदतीचा वापर करून आरोपीचा शोध घेतला आणि अखेर त्याला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिलेल्या सूचनांनुसार तपास पथकाने ही कामगिरी केली. तांत्रिक मदतीच्या आधारे तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शोधून ताब्यात घेण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे.


