(चिपळूण / वार्ताहर)
तालुक्यातील कोंडमळा-निवाचीवाडी येथे वासुदेव बयाजी सावर्डेकर (वय ४०) यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव बयाजी सावर्डेकर हे कोंडमळा-निवाचीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील रहिवासी होते. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती सुहास रघुनाथ सावर्डेकर यांनी पोलिसांना दिली. मृत वासुदेव सावर्डेकर हे त्यांचे सख्खे चुलते होते. घराच्या समोरील बाजूस असलेल्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला नायलॉनची दोरी बांधून वासुदेव यांनी गळफास घेतल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
या घटनेची सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास व कार्यवाही पोलीस करीत आहेत.


