(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कुवारबाव येथील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. दिपाली दिनकर नवाथे असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना मधुमेहाचा आजार होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली नवाथे यांनी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी आपला मुलगा धनंजय दिनकर नवाथे यांना दूरध्वनी करून खालील खोलीत येण्यास सांगितले. मुलगा खाली आला असता त्या खोलीत पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यानंतर त्यांना चारचाकी वाहनातून तातडीने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी ७.२० वाजता दिपाली नवाथे यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १३०/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


