(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथील दिवाळवाडीमधील राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि मनोरंजनात्मक व्यक्तिरेखा साकारत स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
या स्पर्धेत श्री देव बालाजी, भगवान विष्णूंचा वराह अवतार, अंबाबाई माता, सप्तशृंगी देवी, झाशीची राणी, श्रीकृष्ण, मंजुलिका, भूत, ममी आणि ‘बाटलीमधला गंगाराम’ अशा विविध व्यक्तिरेखा सादर करण्यात आल्या. आकर्षक वेशभूषा आणि कल्पक सादरीकरणामुळे स्पर्धेत रंगत निर्माण झाली. विशेषतः झाशीची राणी आणि ‘बाटलीमधला गंगाराम’ यांसारख्या वेगळ्या व्यक्तिरेखांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धकांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
धार्मिक आणि पौराणिक व्यक्तिरेखांमधून सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडले, तर ऐतिहासिक आणि मनोरंजनात्मक वेशभूषांनी स्पर्धेची रंगत वाढवली. सहभागी स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विविध व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्या.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, मुलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे या उद्देशाने राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर पडली. मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.


