(मुंबई / वृत्तसंस्था)
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. हल्ल्याची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गँगशी संबंधित गँगस्टर अनिल पंडित आणि हरमन संधूने सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वीकारली आहे. जुहू परिसरातील पुष्पा पार्कजवळ अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. या घटनेत टायगर श्रॉफ, त्याचा चालक आणि एका रिक्षाचालकासह एकूण तीन जण जखमी झाले आहेत. तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीच्या अगदी जवळ जाऊन या गोळ्या झाडल्या.
समोर आलेल्या व्हिडीओनुसार, टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यासाठी तीन हल्लेखोर आले होते. त्यापैकी दोघांनी टायगरच्या गाडीजवळ जाऊन त्याच्यावर थेट गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यात टायगर श्रॉफला एकही गोळी लागली नाही. या घटनेत त्याचा चालक जखमी झाला.
हल्ल्यापूर्वी टायगर श्रॉफ चालकाच्या बाजूला बसला होता. मात्र, चालक जखमी झाल्याचे समजल्यानंतर टायगरने त्याला स्वतःच्या बाजूला बसवले आणि गाडीची धुरा स्वतःच्या हातात घेतली. जुहू पोलीस ठाण्यासमोरील गल्लीमध्ये सहा ते सात राउंड गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी अभिनेत्याला आश्वस्त करत, “आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करू,” असे सांगितले. मुंबई पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली. या घटनेत टायगर श्रॉफ सुरक्षित असून, त्याला गोळी लागलेली नाही किंवा कोणतीही दुखापत झालेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित पोस्टमध्ये अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. अनमोल बिष्णोई या कथित नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पोस्टमध्ये टायगर श्रॉफला यापूर्वी फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याला ते समजले नाही, असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर आज त्याला योग्य प्रकारे समजावून सांगितल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

सलमान खानसोबत काम न करण्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे चर्चेत आलेला कुख्यात गँगस्टर अनिल पंडित नेमका कोण आहे? यासंदर्भात माहिती समोर आली आहे. सलमान खानसोबत काम करणाऱ्या आणि मुंबईतील चित्रपटसृष्टीत आमचे ऐकणार नाहीत, त्यांचा पुढचा नंबर असेल, असा धमकीवजा इशाराही या पोस्टमधून देण्यात आला आहे. “थांबा आणि वाट पाहा,” असा उल्लेख करत, दुसऱ्या टोळीतील लोक आमचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांनाही मारून प्रसिद्ध करू, अशी धमकी पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
अनिल पंडित हा मूळचा हरियाणातील पाणीपत जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या अमेरिकेत असल्याची माहिती आहे. तो लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटसाठी काम करत असल्याचे समजते. तसेच, तो लॉरेन्स बिश्नोईचा अत्यंत जवळचा मानला जातो. पोलीस रेकॉर्डनुसार, अनिल पंडित २०२२ मध्ये नोकरीच्या निमित्ताने दुबईला गेला होता. त्यानंतर तो ‘डंकी रूट’ने अमेरिकेत पोहोचला. तेथे त्याची भेट लॉरेन्स गँगशी संबंधित गँगस्टर रणदीप मलिक याच्याशी झाली. या भेटीनंतर तो या सिंडिकेटचा सक्रिय सदस्य बनल्याची माहिती आहे.
अनिल पंडितचे नाव यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये समोर आले आहे. हरियाणातील प्रसिद्ध गायक दिलेर खरकिया यांच्या गाडीवर झालेला गोळीबार तसेच राजधानी दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात एका जिमबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. त्याच्यावर खून, खंडणी आणि हत्येचा प्रयत्न यांसारखे १० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, हरियाणा पोलिसांनी यापूर्वी अनिल पंडितवर १० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावरही बिश्नोई गँगने हल्ला केला होता. आता टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारानंतर सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या कथित पोस्टची सत्यता आणि गोळीबारामागील नेमके कारण याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ]


