(रत्नागिरी / वार्ताहर)
जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ ‘आजचा नवोन्मेष, उद्याचे सुदृढ पोषण’ या संकल्पनेवर आधारित मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे झालेल्या या स्पर्धेत १९ स्पर्धकांनी ३३ विविध पदार्थ सादर करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. केतनकुमार चौधरी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मत्स्य पदार्थांचे पोषणमूल्य आणि स्वयंरोजगार निर्मितीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. मत्स्य पदार्थांपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. तसेच, लोकांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यात मत्स्य आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, असे त्यांनी सांगितले.
डॉ. आसिफ उमर पागारकर यांनी प्रास्ताविकात ‘मानवी आरोग्यासाठी माशांचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. माशांचे पौष्टिक गुणधर्म आणि संतुलित आहारातील त्यांचे स्थान याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा चौधरी, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. संदीप सखाराम करे, सचिव रोटे. सीताराम सावंत आणि राजेन्द्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मत्स्य व सागरी खाद्यपदार्थांचे पोषणमूल्य, आहारातील त्यांचा उपयोग, मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि नावीन्यपूर्ण पाककृती याबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धकांनी विविध प्रकारचे मत्स्य पदार्थ सादर केले. पदार्थांची चव, गुणवत्ता, सादरीकरण आणि पाककलेतील नावीन्य या निकषांवर परीक्षकांनी परीक्षण करून विजेत्यांची निवड केली.
स्पर्धेचे परीक्षण एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी स्टडीजच्या फूड प्रॉडक्शन विभागाच्या (किचन) विभागप्रमुख श्रीमती मेघना विनायक शेलार, गद्रे मरीन, रत्नागिरी येथील शेफ श्री. अनिकेत बडबे आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथील प्राध्यापक डॉ. आसिफ पागारकर यांनी केले.
स्पर्धेत श्रीमती दीपिका दिनेश कुबल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. श्रीमती विशाखा विवेक पिलणकर यांनी द्वितीय, तर श्रीमती मीनाक्षी आतिश कीर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिके श्री. अनिरुद्ध श्रीकांत शारंगंधर, कु. वैदेही राजेश चव्हाण, कु. जान्हवी साखरकर आणि कु. वैष्णवी आनंद यादव यांना प्रदान करण्यात आली.
प्रथम क्रमांकासाठी ३,००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी २,००० रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी १,००० रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना प्रत्येकी ५०० रुपये प्रदान करण्यात आले. या सर्व पारितोषिकांचे प्रायोजकत्व रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनने स्वीकारले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी स्पर्धकांचा सत्कारही करण्यात आला.
या उपक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजयकुमार तोरणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वरवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील कर्मचारी तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्पर्धेमुळे मत्स्य आहाराचे पोषणमूल्य, मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत जनजागृती करण्यास मदत झाली.


