( चिपळूण / वार्ताहर )
तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी झाडीझुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या बेकायदा गावठी दारूच्या हातभट्टीवर चिपळूण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गूळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन, उकळते रसायन आणि तयार गावठी दारू असा एकूण १ लाख ४८ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुरज मधुकर चव्हाण (वय ३२, रा. वालोपे गणेशवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०५ वाजण्याच्या सुमारास वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी झाडीझुडपांच्या आडोशाला गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याचे आढळले. सुरज चव्हाण हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना हातभट्टी चालवून गावठी दारू तयार करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे गूळ-नवसागर मिश्रित कुजके रसायनही आढळून आले.
पोलिसांनी कारवाईदरम्यान सुमारे १५० लिटर उकळते रसायन असलेला २०० लिटर क्षमतेचा पत्र्याचा पिंप जप्त केला. तसेच एक हजार लिटर कुजके रसायन असलेल्या ५०० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक टाक्या आणि गूळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन साठवलेले अन्य बॅरल ताब्यात घेतले. याशिवाय २५ लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये २१ लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली.
झाडीझुडपांमध्ये आणखी चार बॅरल आढळले
हातभट्टी परिसराची पंचांसमक्ष पाहणी केली असता, झाडीझुडपांमध्ये गूळ-नवसागर मिश्रित कुजके रसायन साठवलेली आणखी चार प्लास्टिकची बॅरल आढळली. या बॅरलमध्ये एकूण दोन हजार लिटर रसायन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बॅरल आपलीच असल्याचे आरोपीने पंचांसमक्ष सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत एकूण ३ हजार ७५० लिटर कुजके रसायन, उकळते रसायन आणि २१ लिटर गावठी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ४८ हजार ९५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विनोद सहदेव आंबेरकर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


