(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ आणि सार्वजनिक सत्यनारायण पूजा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे. या उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामस्थ आणि भाविकांकडून विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उत्सवादरम्यान देवीची पूजा, आरती, गरबा-दांडिया, भजन, महिलांचे विशेष भजन कार्यक्रम तसेच डबलबारी शक्ती तुऱ्यांचे जंगी सामने यशस्वीपणे पार पडले. आगामी कार्यक्रमांमध्ये धार्मिक उपक्रमांसह लहान मुलांसाठी मनोरंजक स्पर्धा, महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचा समावेश आहे.
१६ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता शक्ती तुऱ्यांचा जंगी सामना होणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता लहान मुलांचे फनी गेम्स, तर रात्री ७ वाजता हनुमान प्रासादिक मंडळ, खालगाव यांचे भजन होणार आहे.
रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता इन्फीगो आय केअरच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता लहान मुलांचे फनी गेम्स, तर ६ वाजता ‘होम मिनिस्टर’ हा लक्षवेधी कार्यक्रम होणार आहे.
सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता केवळ महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रात्री १० वाजता फॅन्सी ड्रेससह विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत देवीचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. यावेळी श्री दत्तकृपा साऊंड लाईट्स व श्री इव्हेंट्स यांच्या माध्यमातून भव्य रोषणाई करण्यात येणार आहे.
हा सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रतीक देसाई जनसेवा कार्यालयासमोरील पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश (बंटी) सुर्वे, उपाध्यक्ष मयुरेश देसाई, सचिव किसन नेवरेकर, खजिनदार गजानन कोवळे यांच्यासह नवरात्र मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, महिला, ग्रामस्थ, हितचिंतक आणि भाविक परिश्रम घेत आहेत.


