(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
तालुक्यातील कुळ्ये-साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या स्टीलच्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील अंदाजे दोन हजार रुपयांची रोकड तसेच मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्क असा एकूण नऊ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार देवरुख पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून २ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कुळ्ये-साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिरात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. मंदिरातील स्टीलच्या दानपेटीचे कुलूप तोडून चोरट्याने त्यातील अंदाजे दोन हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्कही चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या उपकरणांची अंदाजित किंमत साडेसात हजार रुपये असून, चोरीस गेलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत नऊ हजार ५०० रुपये आहे.
नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी कुळ्ये गावचे मुंबई मंडळातील सदस्य गावी आल्यानंतर या घटनेबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर फिर्यादी अनिल राजाराम साळवी (वय ६४, रा. कुळ्ये-साळवीवाडी, ता. संगमेश्वर; सध्या रा. घाटकोपर, मुंबई) यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५ आणि ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्कच चोरीला गेल्याने चोरट्याचा माग काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.


