(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची आणि तिच्या पतीची ११ लाख ३७ हजार १४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विश्वास संपादन करून IPO आणि OTC ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करणाऱ्या या प्रकरणाचा तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांचा मागोवा आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी छडा लावला.
रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये या आर्थिक फसवणुकीची नोंद करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर IPO आणि OTC ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला बळी पडून दाम्पत्याने विविध बँक खात्यांमध्ये एकूण ११ लाख ३७ हजार १४ रुपये जमा केले. मात्र, या व्यवहारांतून फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह बँक खात्यांमधील व्यवहारांचा मागोवा घेतला. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि स्थानिक पातळीवरील तपासाच्या आधारे पैशांच्या व्यवहारांची साखळी तपासण्यात आली. या तपासातून सोलापूर येथील दादासाहेब चौगुले आणि धाराशिव येथील तुषार चौधरी यांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
दोघांना रत्नागिरी येथे आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात फसवणुकीच्या रकमेचा पुढील मागोवा, संबंधित बँक खात्यांचे व्यवहार आणि अन्य संभाव्य सहभागींविषयी तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक नितीन बागाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम आणि आदर्श इंगवले यांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.
जादा परताव्याचे आमिष म्हणजे धोक्याची घंटा!
शेअर बाजार, ट्रेडिंग आणि ऑनलाइन गुंतवणुकीत कमी वेळेत भरघोस नफा मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बागाटे यांनी केले आहे. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरील गुंतवणुकीच्या टिप्स, संशयास्पद ॲप्स किंवा अनोळखी व्यक्तींनी सुचविलेल्या योजनांवर पडताळणी न करता विश्वास ठेवू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था आणि योजनेची सत्यता तपासावी. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा “www.cybercrime.gov.in” (https://www.cybercrime.gov.in) या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


