(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी–हातखंबा महामार्गावर वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून विरुद्ध दिशेने दुचाकी चालविण्याचे प्रकार समोर आले आहेत. १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अवघ्या ११ मिनिटांच्या कालावधीत तीन दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने बेदरकारपणे वाहन चालविताना आढळून आले. या प्रकारांमुळे महामार्गावरील अन्य वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तिन्ही दुचाकीस्वारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१ अन्वये गुन्हे नोंदविले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी कारवांचीवाडी फाट्याजवळ पल्लवी चेतन पानगले (वय ३१, रा. नॅनोसिटी, कारवांचीवाडी) ही टीव्हीएस दुचाकी (एमएच ०८ एवाय ८५७९) रत्नागिरी ते हातखंबा अशा दिशेने विरुद्ध बाजूने चालविताना आढळली. तिच्या वाहनचालविण्यामुळे रस्त्यावरील अन्य वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होण्यासह धोका उद्भवू शकत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सुगंधा हरेश दळवी यांनी फिर्याद दिली. त्यानंतर अवघ्या आठ मिनिटांनी, म्हणजेच सायंकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी, दशरथ भागा पवार (वय ६३, रा. रविंद्रनगर, कुवारबाव) हा फॅशन प्रो दुचाकी (एमएच ०८ एयू २५५५) महामार्गावर विरुद्ध दिशेने बेदरकारपणे चालवित असल्याची नोंद पोलिसांनी केली. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार मनिषा शैलेश होंरबे यांनी फिर्याद दिली.
तिसरी घटना सायंकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी घडली. अब्दुल मेहबुब कोर्गे (वय ४२, रा. श्रीनगर, कारवांचीवाडी) हा फॅशन प्रो दुचाकी (एमएच ०८ एम ७०२१) रत्नागिरी–हातखंबा महामार्गावर विरुद्ध दिशेने चालविताना आढळून आला. त्याच्या वाहनचालविण्यामुळेही रस्त्यावरील अन्य वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सुगंधा हरेश दळवी यांनी फिर्याद दिली.
या तिन्ही प्रकरणांत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एकाच महामार्गावर काही मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या घटना पाहता, वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहनचालकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचा निष्काळजीपणा केवळ संबंधित चालकासाठीच नव्हे, तर समोरून येणाऱ्या वाहनचालकांसाठीही गंभीर धोक्याचे कारण ठरू शकतो.


