(गणपतीपुळे, वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे-विरापुळे नवरात्र उत्सव मंडळाने गेल्या २९ वर्षांपासून जपलेली नवरात्रोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा यंदाही लक्ष वेधून घेत आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मद्यपान आणि मांसाहारापासून दूर राहून श्रद्धा, भक्तिभाव आणि शिस्तीने उत्सव साजरा केला जातो. या परंपरेचे काटेकोर पालन मंडळाचे सदस्य तसेच गावातील तरुण आणि ज्येष्ठ ग्रामस्थ करतात.
नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी मंडळाकडून गावातील नागरिकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, मद्यपान आणि मांसाहार टाळण्याबाबत जनजागृती केली जाते. यासंदर्भात सक्त सूचना देऊन नऊ दिवस या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येते. ग्रामस्थ आणि मंडळाचे सदस्य या सूचनांचे गांभीर्याने पालन करतात. त्यामुळे गेल्या २९ वर्षांपासून ही परंपरा पवित्रता आणि भक्तिभावाने अखंडितपणे जपली जात आहे. या वैशिष्ट्यामुळे तालुक्यातील नवरात्रोत्सवांमध्ये भंडारपुळे-विरापुळे मंडळाचा उत्सव विशेष लक्षवेधी ठरला आहे.
उत्सवाच्या प्रारंभी दुर्गामातेची मूर्ती मालगुंड येथून भंडारपुळे येथे भव्य मिरवणुकीने, वाजतगाजत आणली जाते. त्यानंतर देवीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येते. पुढील नऊ दिवस गावातील ग्रामस्थ आणि मंडळाचे सदस्य मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने नवरात्रोत्सव साजरा करतात. या उत्सवादरम्यान मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यातील एकीचे दर्शन घडते.
नवरात्रोत्सवात कोणतेही भांडणतंटे किंवा वादविवाद होऊ नयेत, याची विशेष काळजी घेतली जाते. विविध जनप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य एकदिलाने कार्यरत असतात. गेल्या २९ वर्षांपासून ही परंपरा गांभीर्याने आणि भक्तिपूर्वक जपली जात असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली. यंदाचाही नवरात्रोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.


