(पुणे / वृत्तसंस्था)
बालगंधर्व रंगमंदिरातील ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याच्या नावाखाली पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदेसह तिच्या साथीदारांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (वय ६५) यांच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दिव्या शिंदेला अखेर अटक करण्यात आली असून, न्यायालयाने तिला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पक्षाघातग्रस्त असलेल्या डॉ. गायकवाड यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करण्यात आला. त्यानंतर दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांड्याने त्यांना मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४), ३३३, १०९(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्या शिंदेला रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तिला पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड २०२१ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते करुणादीप फाउंडेशनचे सदस्य आहेत. या संस्थेच्या वतीने १ ते ३ सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदेला गायकवाड किंवा संस्थेकडून कोणतेही अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते. तसेच कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासही तिला कोणी सांगितले नव्हते. मात्र, कार्यक्रमाची प्रसिद्धी केल्याचे सांगून ऑगस्टपासून तिने गायकवाड यांच्याकडे फोन आणि संदेशांद्वारे पाच लाख रुपयांची मागणी सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील घटनाक्रमात १७ सप्टेंबरला दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि अन्य काही जण गायकवाड यांच्या घरी गेले होते. त्यावेळी गायकवाड घरी नसल्याने त्यांच्या पत्नी आणि मुलाला दमदाटी करून ते निघून गेले. त्यानंतर २३ सप्टेंबरला ढमढेरे याने गायकवाड यांना फोन करून हॉटेल ब्ल्यू नाईन येथे बोलावले. तेथे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर २४ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास गायकवाड घरी एकटे असताना ढमढेरे तेथे आला. दरवाजा उघडताच दिव्या शिंदेसह आठ ते दहा जण घरात घुसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गायकवाड यांच्या तोंडावर, पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. “माझा माणूस पैसे घेण्यासाठी आला होता; तू पैसे का दिले नाहीस?”, असे म्हणत त्यांना जिवंत सोडू नका, अशा आशयाची चिथावणी देण्यात आल्याचा आरोप आहे.
आपण पक्षाघाताचे रुग्ण असल्याचे सांगून गायकवाड यांनी मारहाण थांबविण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतरही एका व्यक्तीने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांड्याने त्यांना मारहाण करण्यात आली. गायकवाड यांच्या पत्नीबाबत धमकी देत त्यांचे तुकडे करण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे.
काही वेळाने गायकवाड यांचा मुलगा आणि सून घरी आल्यानंतर त्यांनाही दमदाटी करण्यात आली. पाच लाख रुपये न दिल्यास कार घेऊन जाण्याची धमकी देण्यात आली आणि आरोपी गायकवाड यांची कार घेऊन निघून गेले. घरातील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.


