(लंडन / वृत्तसंस्था)
जगभरातील दहशतवादाच्या स्थितीचा आढावा घेणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’च्या ‘जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२६’ (Global Terrorism Index 2026) या ताज्या अहवालात पाकिस्तान जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. ८.५७४ गुणांसह पाकिस्तानने बुर्किना फासोला मागे टाकत या निर्देशांकात पहिले स्थान मिळवले आहे. या यादीत भारताचाही पहिल्या १५ देशांमध्ये समावेश आहे.
दहशतवादी घटना, त्यामध्ये होणारी जीवितहानी, जखमींची संख्या, बंधक बनवण्याच्या घटना आणि मालमत्तेचे नुकसान अशा विविध निकषांच्या आधारे या निर्देशांकात देशांचे मूल्यांकन केले जाते. जास्तीत जास्त १० गुणांच्या या मानांकनात पाकिस्तानला ८.६ गुण मिळाले आहेत. पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता आणि तेथे सक्रिय असलेल्या विविध दहशतवादी संघटनांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पाकिस्तानच्या या क्रमवारीमागे तेथील वाढत्या हिंसाचारासह जीवितहानीचे प्रमाणही महत्त्वाचे ठरले आहे. २०२५ मध्ये पाकिस्तानमधील मृत्यूंच्या संख्येत सुमारे ६ टक्क्यांची वाढ झाली. जागतिक पातळीवरील एकूण कलाच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये मृत्यूंची संख्या वाढण्याचे हे सलग सहावे वर्ष ठरले आहे.
दहशतवादी हल्ल्यांची एकूण संख्या मात्र २०२४ मधील १,०९८ वरून २०२५ मध्ये किंचित घटून १,०४५ झाली. त्याच वेळी बंधक बनवण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. २०२४ मध्ये ओलिस ठेवण्याच्या १०१ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. ही संख्या २०२५ मध्ये वाढून ६५५ वर पोहोचली.
जागतिक दहशतवाद निर्देशांकाच्या इतिहासात पाकिस्तान पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तान कायमच सर्वाधिक प्रभावित १० देशांच्या यादीत राहिला आहे. मात्र, वाढती हिंसा आणि जीवितहानीचे उच्च प्रमाण यामुळे यंदा त्याने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.
पाकिस्ताननंतर आफ्रिकेतील साहेल प्रदेशातील देशांमध्ये दहशतवादाचा मोठा प्रभाव असल्याचे अहवालातून समोर आले आहे. बुर्किना फासो ८.३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नायजर आणि नायजेरिया हे दोन्ही देश ७.८ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. माली ७.६ गुणांसह प्रमुख प्रभावित देशांच्या यादीत आहे. पश्चिम आफ्रिकेतील या देशांमध्ये इस्लामी अतिरेकी गट आणि स्थानिक बंडखोरांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दक्षिण आशियातील परिस्थिती पाहता पाकिस्तानव्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि भारताचाही या निर्देशांकात समावेश आहे. अफगाणिस्तान ६.७ गुणांसह ११व्या स्थानावर आहे, तर भारत ६.४ गुणांसह जगात १३व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता कमी असली, तरी जम्मू आणि काश्मीरसह काही इतर भागांतील हिंसक कारवाया आणि नक्षलवादामुळे भारताचा या यादीत समावेश झाला आहे.


