(रत्नागिरी /प्रतिनिधी)
गावाच्या आरोग्याचा प्रश्न केवळ शासकीय यंत्रणेपुरता मर्यादित न ठेवता त्याला लोकसहभागाची जोड देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला रत्नागिरी जिल्ह्यात गती देण्यात आली आहे. या अभियानांतर्गत शिरगाव, नाचणे, खानावली, हर्चे आणि साखरपा या ग्रामपंचायतींमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. राज्यस्तरीय पथकाने ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्यविषयक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
नॉलेज लिंक आणि ॲक्शन फॉर बेटर टुमॉरो सोसायटीचे श्री. राजू गुट्टे तसेच स्टेट पीएमयूच्या श्रीमती प्रीती साबळे यांनी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमात केवळ शासकीय सूचना देण्याऐवजी प्रत्यक्ष कृती आणि लोकसहभागाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच विविध समित्यांचे सदस्य सहभागी झाले. गावातील आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
‘माझे गाव आरोग्यसंपन्न कसे होईल?’ या प्रश्नाचे उत्तर गावकऱ्यांनीच शोधणे आवश्यक असल्याचे राज्यस्तरीय पथकाने स्पष्ट केले. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, गावातील समस्या आणि त्यामागील कारणांची ओळख तसेच स्थानिक पातळीवर करता येणाऱ्या उपाययोजनांचा शोध घेऊन ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. पाहणीदरम्यान नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून गावाचा नकाशा तयार करण्यात आला. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींची त्यामध्ये नोंद करण्यात आली. त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर राबविता येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. सार्वजनिक समस्या, त्यामागील कारणे आणि त्यावर करता येणाऱ्या स्थानिक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करून ग्रामस्थांच्या सूचना व अभिप्राय जाणून घेण्यात आले.
‘हे आपले अभियान’ ही भावना रुजविण्याचा प्रयत्न
आरोग्यसंपन्न गावाची निर्मिती केवळ सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतून शक्य नसून त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. अभियानातील प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग वाढवून ‘हे आपले अभियान आहे’ ही भावना रुजविण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, इतर संबंधित शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ यांनी परस्पर समन्वयाने काम केल्यास गावाच्या आरोग्यविषयक स्थितीत शाश्वत बदल घडवून आणता येऊ शकतो, असा विश्वास राज्यस्तरीय मार्गदर्शकांनी व्यक्त केला. त्यामुळे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ शासकीय अभियान न राहता ग्रामस्थांच्या पुढाकारातून लोकचळवळीचे स्वरूप धारण करावे, यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.


