(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीतील जे.के. फाईल्स ते गद्रे मरीन या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाच या मार्गाच्या विकासाला आता गती मिळाली आहे. हायवेला मिरजोळे एमआयडीसीशी जोडणारा सुमारे १,८०० मीटरचा हा प्रमुख मार्ग चौपदरी करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली असून मार्च २०२७ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मिरजोळे एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी जे.के. फाईल्स येथून जाणारा हा प्रमुख मार्ग पावसाळा आणि अवजड वाहनांच्या सातत्यपूर्ण वाहतुकीमुळे खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत होती. मात्र, केवळ डागडुजीवर समाधान न मानता भविष्यातील वाहतुकीचा वाढता भार लक्षात घेऊन जे.के. फाईल्स ते गद्रे मरीनपर्यंतच्या मार्गाचेच चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन आणि विद्युत वाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष रस्ते बांधकामाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
नव्या रस्त्याची रचना करताना केवळ वाहतुकीची क्षमता वाढविण्यावर भर न देता त्याला सुंदर आणि सुबक स्वरूप देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक उभारून त्यामध्ये आकर्षक वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्युत दिवे, काँक्रीटीकरण, दोन्ही बाजूंना फुटपाथ आणि गटारांची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीकडे जाणारा हा मार्ग अधिक सुरक्षित आणि देखणा होण्याची अपेक्षा आहे.
मिरजोळे एमआयडीसीतील अनेक उद्योगांची दैनंदिन वाहतूक याच मार्गावरून होते. जागतिक बाजारपेठेत निर्यात करणाऱ्या गद्रे मरीनसह विविध मरीन कंपन्यांच्या अवजड वाहनांची ये-जा या मार्गावर असते. त्याच परिसरात तटरक्षक दलाचे आस्थापन तसेच अभियांत्रिकी आणि पदवी महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही मोठी वर्दळ या रस्त्यावर असते. याशिवाय प्रस्तावित रत्नागिरी विमानतळाशी शहराची जोडणी करणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे औद्योगिक वाहतुकीबरोबरच भविष्यातील पर्यटन आणि विमानतळाशी संबंधित वाहतुकीचा विचार करता या रस्त्याच्या चौपदरीकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एमआयडीसीकडून ‘स्मार्ट’ मार्गाची आखणी
राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील रस्ते सुस्थितीत करण्यावर भर दिला आहे. मिरजोळे एमआयडीसीतील जवळपास ९० टक्के रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी जे.के. फाईल्स–गद्रे मरीन हा प्रमुख मार्ग भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीचा औद्योगिक विकास, वाढती वाहतूक आणि पर्यटनाच्या दृष्टीने शहराचे बदलते स्वरूप लक्षात घेता हा मार्ग केवळ एमआयडीसीतील वाहतुकीचा रस्ता न राहता शहराच्या नव्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रवेशद्वार ठरण्याची शक्यता आहे. मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीकडून तयारी सुरू असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला आणखी गती देण्यात येणार आहे.


