(जैतापूर / वार्ताहर)
व्यावसायिक इंग्रजी संभाषण अधिक प्रभावी, अचूक आणि संदर्भानुरूप करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) यावर आधारित नावीन्यपूर्ण संगणकीय प्रणाली प्रा. श्रीम. मंजुषा दादाबा सूर्यवंशी यांनी विकसित केली आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाकडून (Intellectual Property India) युटिलिटी पेटंट नोंदणी प्राप्त झाली असून, हे पेटंट नुकतेच अधिकृतरीत्या प्रकाशित झाले आहे.
व्यावसायिक इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी विकसित करण्यात आलेली ‘Real Time Context Aware System’ अर्थात ‘तात्काळ संदर्भ जागरूक संगणकीय प्रणाली’ ही व्यावसायिक आणि व्याकरणदृष्ट्या अचूक इंग्रजी संदेश पाठविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रा. सूर्यवंशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया (Natural Language Processing) यांचा वापर करून ही प्रणाली विकसित केली आहे.
या प्रणालीमध्ये संदेश किंवा ई-मेल पाठविताना त्याचा संदर्भ अचूकपणे ओळखण्याची क्षमता आहे. संदेश कोणाला पाठविला जात आहे, विषयाचे महत्त्व किंवा तातडी किती आहे आणि त्यासाठी किती औपचारिक भाषा आवश्यक आहे, हे प्रणाली आपोआप समजून घेते.
इंग्रजी भाषेची रचना सुधारताना मूळ संदेशाचा अर्थ कायम ठेवण्यावरही या प्रणालीमध्ये भर देण्यात आला आहे. कामाशी संबंधित तांत्रिक शब्द, तारखा आणि आकडेवारीमध्ये कोणताही बदल होऊ नये, याची काळजी प्रणालीद्वारे घेतली जाते. तसेच माहितीची गोपनीयता कायम ठेवून अत्यंत कमी वेळेत म्हणजेच ‘रिअल टाइम’मध्ये योग्य भाषिक रचना तयार केली जाते.
संदेश पाठविण्यापूर्वी त्याची अचूक तपासणी करण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये आहे. त्यामुळे तयार झालेल्या संदेशामध्ये कोणतीही भाषिक किंवा व्याकरणाची चूक राहू नये, यासाठी तो पूर्णपणे तपासला जातो.
प्रा. श्रीम. मंजुषा सूर्यवंशी या रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे कॉलेज, राजापूर (विखारे-गोठणे) येथील इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या संशोधनात्मक कार्याची दखल घेत भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाकडून युटिलिटी पेटंट प्रकाशित करण्यात आले आहे.
या संशोधनातील यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागीय चेअरमन सौ. संगीताताई पाटील, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. विक्रांत पाटील, सर्व सदस्य तसेच प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांनी प्रा. श्रीम. मंजुषा सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या संशोधनात्मक यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.


