यंदा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान १२ दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या पंचांगानुसार १४ सप्टेंबर रोजी हरितालिका तृतीया आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या आहेत, अशी माहिती मोहन दाते यांनी दिली.
१४ सप्टेंबर रोजी तृतीया तिथीची समाप्ती सकाळी ७:०७ वाजता होणार आहे. हरितालिका तृतीयेसाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया आवश्यक असते, तर गणेश चतुर्थीसाठी चतुर्थी तिथी मध्याह्नकाल व्यापिनी असणे आवश्यक असते. १४ सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी तृतीया आणि मध्याह्नकाळी चतुर्थी असल्याने दोन्ही व्रते एकाच दिवशी आली आहेत.
तिथीचे सूर्योदयकाली किंवा मध्याह्नकाली असणे, हे नियम व्रताच्या दिननिश्चितीसाठी आहेत. व्रतकर्त्याने त्याच कालावधीत पूजन करावे, असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०७ वाजता तृतीया समाप्त होण्यापूर्वीच हरितालिका पूजन करावे किंवा त्यानंतरच गणेशपूजन करावे, अशी सक्ती नाही. तृतीया समाप्तीपूर्वी अथवा त्यानंतरही हरितालिका पूजन करता येईल. त्याचप्रमाणे सकाळी ७:०७ पूर्वीही गणेश चतुर्थीनिमित्त पार्थिव गणेशाचे पूजन करता येईल.
उषःकालापासून मध्याह्न समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्य काळ मानला जातो. तसेच दोन्ही व्रतांचे कर्ते भिन्न असल्याने हरितालिका आणि गणेश चतुर्थीचे पूजन आधी किंवा नंतर करता येऊ शकते, असे मोहन दाते यांनी स्पष्ट केले.
उपवास आणि पारणाबाबत माहिती देताना मोहन दाते यांनी सांगितले की, हरितालिकेचा उपवास दिवसभर करायचा असून १४ सप्टेंबर रोजी उपवास करून १५ सप्टेंबर रोजी मंगळवारी तो सोडावा.
ज्यांचे १६ सोमवारचे व्रत आहे, त्यांनी सोमवारी सायंकाळी पूजन झाल्यानंतर चुरम्याचा वास घ्यावा. त्यामुळे १६ सोमवारचा प्रसाद घेऊन उपवास सोडला असे मानले जाईल. तसेच ज्यांना ऋषिपंचमीचाही उपवास करायचा आहे, त्यांनी १५ सप्टेंबर रोजी सकाळी हरितालिकेची उत्तरपूजा करून विसर्जन करावे. त्यानंतर भाताच्या एका घासाचा वास घेऊन हरितालिकेचा उपवास सोडावा आणि मंगळवारी ऋषिपंचमीचा उपवास नेहमीप्रमाणे करावा, असेही मोहन दाते यांनी सांगितले.
यापूर्वी २००६ आणि २००९ मध्येही हरितालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या.


