(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
फणसवळे येथील जंगलमय परिसरात गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून दोन आरोपींना जेरबंद केले असून, अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झालेल्या अन्य दोघांचा शोध सुरू आहे. ही कारवाई गुरुवारी (३ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
फणसवळे गावाच्या जंगलमय परिसरात २० ऑगस्ट रोजी घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली तसेच पोलीस अंमलदार संकेत महाडीक, सागर साळवी आणि स्वप्निल तेरवणकर हे ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करबुडे फाटा ते फणसवळे मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी गुन्ह्याच्या घटनास्थळाजवळील जंगलात झाडीझुडपांच्या आड एक संशयास्पद चारचाकी वाहन उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पोलिसांचे पथक वाहनाजवळ जाताच त्यातील आरोपींनी पोलिसांच्या अंगावर वाहन घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर शासकीय वाहन उभे असल्याने आरोपींना त्या दिशेने जाता आले नाही. त्यानंतर त्यांनी वाहन जंगलाच्या दिशेने मागे घेण्याचा प्रयत्न केला. याच वेळी वाहनाच्या पुढील चाकांमध्ये बेशुद्ध अवस्थेतील गोवंश अडकल्याने वाहन पुढे जाऊ शकले नाही. वाहन थांबताच आरोपींनी वाहनातून उतरून जंगलाच्या दिशेने धाव घेतली. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी धाडसाने झडप घालत झटापट करून मोहसीन बाबू कुरेशी (३०, रा. मिरा रोड, मुंबई) याला ताब्यात घेतले.
दरम्यान, अन्य आरोपींनी अंधाराचा फायदा घेत जंगलात पलायन केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. त्यानंतर जंगल परिसरात ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सुमारे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहेनशाहा अब्दुल सत्तार शेख (४८, रा. जनता सेवक सोसायटी, माहीम पश्चिम, मुंबई) याला जंगलातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता जंगलात पसार झालेल्या अन्य दोन आरोपींची नावे अस्लेम (रा. बांद्रा-कुर्ला, मुंबई) आणि देवा (रा. विरार) अशी असल्याची माहिती समोर आली. या दोघांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), १३२, ३३६(३), ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ मधील कलम ५, ५(अ), ५(ब) आणि ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळण्यासाठी रत्नागिरी येथील न्यायालयात हजर करण्यात येत आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली तसेच पोलीस अंमलदार संकेत महाडीक, सागर साळवी, स्वप्निल तेरवणकर आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

