( रत्नागिरी / वार्ताहर )
राज्य पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा आणि अभ्यासवर्ग १ व २ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत उत्साहात पार पडला. फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वार्षिक सभेत फेडरेशनच्या पोटनियमांमध्ये विविध बदल करण्यास मंजुरी देण्यात आली. फेडरेशनचे वर्गीकरण ‘अन्य संस्था’ प्रकारात करण्यासही सभेने मान्यता दिली.
पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी शासनाने भरीव योगदान द्यावे, तसेच यासाठी योग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित होईपर्यंत संस्थांवर अंशदान भरण्याची सक्ती करू नये, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. पतसंस्थांना ‘क्रेडिट इन्स्टिट्यूशन’ म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्रीय कायद्यातील तरतुदींचा वापर आरबीआयने करावा, अशी मागणीही करण्यात आली.
पतसंस्थांचे वाढते व्यवहार लक्षात घेऊन त्यांच्या व्यवहाराच्या प्रमाणानुसार श्रेणी व वर्गवारी निश्चित करावी आणि पतसंस्थांच्या वाढीस पूरक धोरण ठरवावे, यासाठी प्रयत्न करण्याचा ठरावही पारित करण्यात आला.
पतसंस्थांसाठी प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संस्थांच्या व्यवहारांचे कायद्याच्या चौकटीत दस्तऐवजीकरण करण्यासाठी अर्ज, करार, रोखे आदी कागदपत्रांचे आदर्श नमुने असलेली पुस्तिका दोन महिन्यांत प्रकाशित करण्यात येईल, अशी घोषणा फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली.
पतसंस्थांनी आपली प्रतिमा अधिक विश्वासार्ह आणि शिस्तप्रिय राहील यासाठी सजग राहावे, तसेच युवा वर्गाला संस्थांशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन पटवर्धन यांनी केले. प्रत्येक महिन्यात किमान १० नवीन युवकांना संस्थेशी जोडण्याचा कार्यक्रम सर्व संस्थांनी अग्रक्रमाने राबवावा, असेही त्यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.
अभ्यासवर्गाचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक श्री. राम कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अभय माटे, जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, डॉ. सोपान शिंदे आणि श्री. सुहास पाटणकर यांनी अभ्यासवर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी श्री. अभय माटे यांनी प्रथमच DPDP कायदा आणि डेटा संरक्षणाबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
कार्यक्रमात विविध प्रायोजकांनी त्यांच्या सॉफ्टवेअर, ॲप्स आणि विमा योजनांची माहिती संस्थांच्या प्रतिनिधींना दिली. या आयोजनासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भरीव सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला फेडरेशनचे महासचिव राजोबा सर, उपाध्यक्ष डॉ. शिंगी, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. भोसले, श्री. छाबडा, प्रा. श्री. आकरे, श्री. वाजे, श्री. तांबेकर, श्री. बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लवांदे यांच्यासह विभागीय फेडरेशनचे संतोष थेराडे, सिंधुदुर्ग पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. राऊळ, डीसीसी बँकेचे संचालक श्री. सचिन भिंगारडे, शिवकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष लेंभे, राजापूर कुणबी संस्थेचे अध्यक्ष मांडवकर आणि नागपूर पतसंस्था जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ऐन श्रावण मासात रत्नागिरीत सहकाराचा हा महामेळावा उत्साहात आणि उत्तम नियोजनात पार पडला. रत्नागिरीत झालेल्या या व्यापक सहकार आयोजनाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले.

