(संगमेश्वर / शांताराम गुडेकर)
कोकणातील गणेशोत्सव हा उत्साह, परंपरा आणि लोककलेचा अनोखा संगम मानला जातो. गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील विविध लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते. त्यामध्ये जाकडी नृत्य अर्थात शक्ती-तुरा नृत्याला विशेष स्थान आहे. शक्ती-तुरा ही कोकणच्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत हा नृत्यप्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो. कुणबी समाजातील श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्यप्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. नृत्यातील थाट, गाण्याचा ताल आणि संगीत साधने कालपरत्वे बदलली असली, तरी या नृत्याचे मूळ स्वरूप कायम असल्याचा अनुभव ते पाहताना येतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण गावचे सुपुत्र विजय शंकर करंबेळे, मनसे अध्यक्ष व शारीरिक सेना विभाग प्रमुख, ओशिवरा-जोगेश्वरी यांच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून आपल्या मूळ गावी कासार कोळवण येथे कोकणातील लोककला, टिपरी नृत्य, फुगडी आणि नाच अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून लोककलेचे जतन आणि तिच्या उन्नतीसाठी सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत.
यावर्षी गणेशोत्सवानिमित्त सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता साई कृपा टिपरी नृत्य, कासार कोळवण यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शाहीर गायिका सौ. पायल प्रशांत करंबेळे यांचे टिपरी नृत्य (फुगडी) सादरीकरण होणार आहे.
तसेच गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता कासार कोळवण (उगवती वाडी), ता. संगमेश्वर, व्हाया देवरुख, जि. रत्नागिरी येथे शक्ती-तुरा डब्बल बारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जंगी सामन्यात कोकण रत्न पुरस्कार प्राप्त, कॅसेट किंग कवी शक्तीवाले शाहीर संदीप मोरे, खेड आणि ॐ सिद्ध सेवा नाच मंडळ, धावडेवाडी, हातीवले, राजापूरचे तुरेवाले कवी शाहीर नितीन गोसावी, राजापूर यांच्यात सामना रंगणार आहे.
विजय करंबेळे गेल्या १५ वर्षांपासून होळी उत्सव, गणपती उत्सव तसेच कोकणातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून अनेक उपक्रम राबवत आहेत. मुंबई आणि कासार कोळवण येथे त्यांनी अनेक लोकउपयोगी कामेही केली आहेत.
या सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी पंचक्रोशीतील तमाम रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

