(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. खेड, मंडणगड, रत्नागिरी शहर आणि देवरूख पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करणाऱ्यांसह मटका जुगार खेळविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवायांमध्ये दारू प्राशन करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, रत्नागिरी शहरात मटका जुगारप्रकरणी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
खेड तालुक्यातील भोस्ते पुलाजवळील विसर्जन पॉईंटवर दारू सेवन करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. राजू ऊर्फ संदिप आरियान दिवाकरकुमार (रा. मुकादम कॉम्प्लेक्स, खेड) हा ३० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.०२ वाजता कोणताही परवाना नसताना दारू पिताना आढळून आला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६२/२०२६ दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये कारवाई करण्यात आली. याच ठिकाणी अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने राहुल मसुरीयादीन कुमार (वय २३, रा. मुकादम कॉम्प्लेक्स, खेड) याच्यावरही कारवाई करण्यात आली. ३० ऑगस्ट रोजी रात्री ८.१० वाजता तो सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करताना आढळून आला. त्याच्याविरोधात गुन्हा क्रमांक २६३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाया खेड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केल्या.
मंडणगड चौकातील छकुली देशी दारू दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळून आलेल्या संदेश संतोष रांगले (वय ३७, रा. तुळशी-जांभुळनगर, मंडणगड) याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.२८ वाजता तो दारूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आढळला. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये कारवाई करण्यात आली.
रत्नागिरीत मटका जुगाराचा डाव उधळला
दरम्यान, रत्नागिरी शहर पोलिसांनी मुरुगवाडा-पांढरासमुद्र परिसरात कारवाई करत मेन मुंबई मटका जुगार खेळविणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. रोनित निवास भोंगले (वय ३२, रा. पंधरमाड-मुरुगवाडा, रत्नागिरी) हा ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकीच्या आडोशाला मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १ हजार ५१० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१०/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली.
देवरूखमध्ये महामार्गाच्या कडेला दारू सेवन
देवरूख पोलीस ठाण्याच्या हद्दीतही सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. गणेश दिलीप शिंदे (वय ३८, रा. कोंडगाव-शिंदेवाडी, ता. संगमेश्वर) हा ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील कबनुरकर हॉलसमोरील रस्त्याच्या साईडपट्टीच्या कठड्यावर बिअरची बाटली घेऊन दारू पिताना आढळून आला. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४०/२०२६ दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ९० अन्वये कारवाई करण्यात आली.

