( संगमेश्वर / एजाज पटेल )
संगमेश्वर शहर, बाजारपेठ तसेच मुख्य महामार्गावर सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चालकांविरोधात संगमेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केली. ३० ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या या कारवाईत वाहतुकीसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या तीन वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
संगमेश्वर बाजारपेठ ते रामपेठ दरम्यानच्या मुख्य सार्वजनिक रस्त्यावर पहिली कारवाई करण्यात आली. मे. प्रिया फूड्स या दुकानासमोर चालकाने महिंद्रा बोलेरो पिकअप (एम.एच. १२ क्यु.जी. ८३४८) पादचाऱ्यांसह इतर वाहनांच्या ये-जा करण्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मच्छिंद्र मांडरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप राजाराम सकटे (वय ४०, रा. मोहरे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई संगमेश्वर ते चिपळूण जाणाऱ्या मुख्य महामार्गावर करण्यात आली. आरोपी चालक संदेश संजय साबळे (वय २०, रा. फणसवणे) याने पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप (एम.एच. ०८ ए.पी. ७८३४) महामार्गावर रहदारीस थेट अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल महादेव बंडगर यांच्या तक्रारीवरून चालकाविरोधात कारवाई करण्यात आली.
तिसरी कारवाई संगमेश्वर ते देवरुख जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दत्तकृपा मोबाईल शॉपीसमोर करण्यात आली. चालक शैलेश प्रभाकर दाभाडे (वय ५२, रा. कोड असुर्डे) याने मारुती वॅगनआर (एम.एच. ०८ ए.एक्स. ०८२४) रस्त्याच्या मध्यभागी नागरिकांच्या तसेच वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत पार्क केली होती. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मांडरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या तिन्ही प्रकरणांमध्ये संगमेश्वर पोलिसांनी संबंधित चालकांविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम २८३ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
सार्वजनिक रस्ते आणि बाजारपेठेत बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात यापुढेही कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा संगमेश्वर पोलीस प्रशासनाने दिला आहे.

