(बारामती / वृत्तसंस्था)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अजित डशवदारे यांच्या १४ वर्षीय मुलीच्या मृत्यूने बारामतीत खळबळ उडाली होती. मुलीचा मृतदेह शहरातील एका पाच मजली इमारतीत आढळून आल्यानंतर तिच्या मृत्यूबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणात कोणताही घातपात नसल्याचे स्पष्ट झाले असून, अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी आईने रागावल्यामुळे नाराज झाली होती. त्यानंतर ती घरातून निघून गेली आणि रात्रभर घरी परतली नाही. मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध सुरू केला. मात्र, बराच शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान, पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू असतानाच शहरातील एका पाच मजली इमारतीत तिचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मृत्यूची परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू केला. आमदार रोहित पवार यांनीही पोलिसांना या घटनेचा सखोल आणि काटेकोर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचा धागा
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले. या फुटेजमध्ये अल्पवयीन मुलगी इमारतीच्या जिन्यावरून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातही हा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व तपासाच्या आधारे या प्रकरणात अन्य कोणत्याही व्यक्तीचा सहभाग किंवा घातपाताचा पुरावा आढळला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. मुलगी आईने रागावल्यामुळे नाराज झाली होती आणि त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि तपासातील इतर बाबींच्या आधारे मुलीचा मृत्यू आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.
अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय गावी असताना घरात चोरी
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीच्या अंत्यसंस्कार आणि इतर विधींसाठी कुटुंबीय इंदापूर तालुक्यातील सणसर येथील जाचक वस्ती या मूळ गावी गेले असताना बारामतीतील त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी घर फोडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या चोरीत नेमकी किती रक्कम किंवा कोणत्या वस्तू चोरीला गेल्या, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या प्रकरणी अद्याप चोरीचा गुन्हा दाखल झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तालुका पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असून, चोरट्यांच्या हाती विशेष काही लागले नसल्याचे सांगितले. तसेच संबंधित कुटुंबाला सध्या तक्रार दाखल करण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

