(संगमेश्वर / एजाज पटेल)
आयुष्य कसे जगावे आणि नाती मायेने कशी जपावीत, याचा वस्तुपाठ आपल्या जगण्यातून देणारी, कुटुंबाला आणि परिसराला मायेच्या धाग्यात बांधून ठेवणारी कोंडये येथील सविता(माई) शितप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अवघ्या चार दिवसांच्या आजारपणानंतर उपचारादरम्यान शस्त्रक्रियेच्या टेबलावरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने फुणगूस ते कोंडये परिसरावर शोककळा पसरली असून, शितप आणि फटकरे कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फुणगूस येथील धोंडू फटकरे यांची कन्या असलेल्या सुलभा यांनी १९९० मध्ये कोंडये मधलीवाडी येथील शितप परिवारात सविता आल्या. तब्बल ३६ वर्षांच्या संसारिक प्रवासात त्यांनी केवळ संसाराची जबाबदारी पार पाडली नाही, तर आपल्या कष्ट, त्याग, प्रेम आणि मायेच्या बळावर संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवले. पन्नाशी ओलांडल्यानंतरही साठीचा टप्पा गाठण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
नेहमी शेतात राबणाऱ्या, हसतमुखाने प्रत्येकाची विचारपूस करणाऱ्या आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सविता माई अचानक आजारी पडतील, याची कुणालाही कल्पना नव्हती. अवघ्या चार दिवसांतच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना पुन्हा पूर्ववत पाहण्यासाठी कुटुंबीयांनी उपचारासाठी धावपळ सुरू केली. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न करत अखेर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. उपचार सुरू असतानाच शस्त्रक्रियेच्या टेबलावर त्यांची प्राणज्योत मालवली आणि कुटुंबीयांच्या आशेचा शेवट झाला. ही दुःखद बातमी फुणगूस आणि कोंडये परिसरात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली.
फटकरे कुटुंबातील सुलभा ही लहानपणापासूनच कष्ट, साधेपणा आणि स्वाभिमानाची मूर्ती होती. माहेरच्या शेतकरी कुटुंबातून मिळालेले संस्कार आणि कष्टाची शिकवण त्यांनी सासरीही जपली. संसाराच्या सुरुवातीच्या काळात काटकसरीने घर सांभाळताना त्यांनी स्वतःच्या सुखापेक्षा कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य दिले. सासू-सासरे, दीर-जाऊ, नणंद, मुले आणि सुना अशा मोठ्या कुटुंबाला प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
काळ बदलला, परिस्थिती सुधारली, मुले शिकून मोठी झाली; मात्र सविता माईंनी कष्टाची साथ कधीच सोडली नाही. शेवटच्या दिवसापर्यंत त्या शेतात राबत राहिल्या. घरातील मोठी व्यक्ती म्हणून अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला अडचण आली की, माईंचा आधार सर्वप्रथम मिळायचा. त्यामुळे त्या केवळ कुटुंबातील एक सदस्य नव्हत्या, तर संपूर्ण परिवाराचा आधारस्तंभ होत्या.
त्यांचा हसतमुख चेहरा, डोक्यावर साडीचा पदर आणि तोंडात पानाचा विडा, हे त्यांचे परिचित रूप फुणगूस आणि कोंडये परिसरातील प्रत्येकाच्या स्मरणात कायम राहणार आहे. माहेरच्यांसाठी त्या ‘सुलभा’, तर सासरच्यांसाठी ‘सविता’ होत्या. मात्र, नात्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रत्येकाला आपले मानले. वयाने लहान असो किंवा मोठे, प्रत्येकाशी आदराने आणि मायेने बोलणे हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता.
देवधर्म आणि परंपरांबद्दलही त्यांच्या मनात विशेष आस्था होती. गावातील सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, भजन, देवकार्य किंवा कौटुंबिक धार्मिक सोहळा असो, सविता माई उत्साहाने सहभागी होत. घरातील देवघराची पूजा-अर्चा त्या निष्ठेने सांभाळत. मकरसंक्रांतीचे वाण, तुळशीविवाह, भजनाचे कार्यक्रम, गणेशोत्सवातील महाप्रसादाची तयारी अशा धार्मिक आणि पारंपरिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. आपल्या पुढील पिढीवरही त्यांनी देवधर्म, संस्कार आणि आचार-विचारांची शिदोरी सोपवली.
सविता माईंच्या हातच्या जेवणाची चवही त्यांच्या आठवणींचा एक अविभाज्य आहे. गणेशोत्सवातील उकडीचे मोदक असोत, चिकन-वडे असोत किंवा शेतातील मळणीच्या दिवसांत तयार होणारी साधी भाकर असो, त्यांच्या हातच्या जेवणात मायेची चव असायची. घरातील प्रत्येकाला प्रेमाने जेवू घालण्यात त्यांना विशेष आनंद मिळायचा. त्यामुळे त्यांच्या हातच्या पदार्थांची चव आणि त्यामागची माया कुटुंबीयांच्या कायम स्मरणात राहील.
अवघ्या चार दिवसांच्या आजारपणानंतर उपचारादरम्यान झालेला त्यांचा मृत्यू हा कुटुंबीयांसाठी मोठा धक्का आहे. जगवण्यासाठी कुटुंबीयांची धडपड सुरू असताना आणि डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच नियतीने त्यांना हिरावून नेले. त्यांच्या अकाली निधनाने शितप आणि फटकरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, फुणगूस, कोंडये आणि परिसरातील नागरिकांमधूनही तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
शरीराने सविता माई आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचा हसरा चेहरा, कष्टाळू वृत्ती, मायेची ऊब, देवधर्मावरील श्रद्धा, घराला एकत्र ठेवणारे संस्कार आणि प्रत्येकाला आपलेसे करण्याची त्यांची विलक्षण हातोटी त्यांच्या आठवणींतून कायम जिवंत राहील. फुणगूसच्या माहेरापासून कोंडयेच्या सासरापर्यंत त्यांनी जोडलेली माणसे आणि जपलेली नाती हाच त्यांच्या आयुष्याचा खरा ठेवा आहे. सविता माईंच्या निधनाने एका व्यक्तीचा नव्हे, तर एका मायेच्या सावलीचा अंत झाला आहे.

