(मुंबई)
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणात आता आणखी एक मोठी कारवाई समोर आली आहे. हगवणे कुटुंबाच्या नात्यातील आणि सध्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याकडून गृहविभागाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागांच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे.
वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. तिच्या सासरच्या लोकांनी छळ केल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असून या प्रकरणी राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांच्यासह इतरांची अटक झाली आहे. तपासादरम्यान कसपटे कुटुंबीयांनी आरोप केला की, सुपेकर हे आरोपींना मदत करत होते आणि त्यांच्या नावाचा वापर करून पोलीस व तक्रारदारांवर दबाव टाकण्यात येत होता.
या आरोपांनंतर गृहविभागाने त्वरीत पावले उचलली आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही यापूर्वी सुपेकर यांच्याविरोधात गंभीर आरोप करत, त्यांचे 500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित पुरावे प्रसिद्ध केले होते.
सुपेकर यांच्याकडील कार्यभार का काढण्यात आला?
जालिंदर सुपेकर सध्या विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदावर कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याकडे एकाच वेळी कारागृह उपमहानिरीक्षक – नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर विभागांचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला होता.
शासनाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे, “कारागृह उपमहानिरीक्षक ही कनिष्ठ संवर्गातील पदे असून त्यांचा कार्यभार वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याकडे देणे प्रशासकीयदृष्ट्या उचित नाही.” याच अनुषंगाने, गृहविभागाने या तीन विभागांचे कार्यभार सुपेकर यांच्याकडून काढून घेत इतर अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत.