(देवळे / प्रकाश चाळके)
वाडापेठ कुंभारवाडी येथे शिवसेना पक्षात प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद मिळाला. कुंभारवाडीचे अध्यक्ष सुधाकर माटल तसेच ज्येष्ठ शिवसैनिक व माजी उपविभाग प्रमुख हरिश्चंद्र कुंभार यांनी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला.
या सोहळ्यावेळी परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार किरण सामंत यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले, “शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष असून विकासाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अनुभवी कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे मतदारसंघातील विकासकामांना निश्चितच गती मिळेल.”
सुधाकर माटल आणि हरिश्चंद्र कुंभार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असून, पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू.”
या कार्यक्रमात वाडापेठ शाखाप्रमुख सुरेंद्र कारेकर, उपसरपंच सुनील रूमडे, माजी महिला विभाग प्रमुख स्नेहल रूमडे यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षप्रवेश केला. तसेच तालुका प्रमुख दीपक नागले आणि पंचायत समिती सभापती नंदिनी कदम यांची उपस्थिती होती.
या भव्य प्रवेशामुळे कुंभारवाडी परिसरात शिवसेना पक्षाला नवसंजीवनी मिळणार असल्याची चर्चा असून, स्थानिक राजकारणात या घडामोडींचा प्रभाव आगामी काळात दिसून येणार आहे.

