(चिपळूण)
खेर्डी येथे ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका आर्किटेक्टचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर चंद्रकांत चिवेलकर (वय ३३) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री चिपळूण–कराड मार्गावर खेर्डी येथे रात्री सुमारे पावणेबाराच्या सुमारास हा अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार, समीर चिवेलकर हे दुचाकीवरून खेर्डी–शिगवणवाडी मार्गावर जात असताना, रस्ता ओलांडत असलेल्या दुसऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाची धडक बसली. या अपघातात ते रस्त्यावर कोसळले आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. यावेळी त्यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
समीर चिवेलकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.