(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील, कवीवर्य केशवसुतांच्या जन्मभूमीत वसलेल्या आदर्श जीवन शिक्षण शाळा क्रमांक १ च्या शतकोत्तर अमृत महोत्सवाची सांगता शनिवारी उत्साहात पार पडली. या सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.
शाळेच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपात हा समारंभ मोठ्या दिमाखात झाला. यावेळी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना ना. उदय सामंत यांनी मालगुंडच्या संस्कारक्षम भूमीचे विशेष कौतुक केले. “आदर्श जीवन शिक्षण शाळेने गेली ७५ वर्षे ज्ञानाची ज्योत तेवत ठेवत सुसंस्कृत पिढी घडवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात या शाळेचा मोठा वाटा आहे. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि आधुनिक सुविधा उभारण्यासाठी शासनाच्या स्तरावरून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शतकोत्तर अमृत महोत्सव समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन ना. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती व अमृत महोत्सव समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षणतज्ज्ञ, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि महोत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

