( पणजी )
रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सतर्कता आणि प्रामाणिकपणामुळे एका प्रवाशाला त्याचा मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याची उल्लेखनीय घटना मडगाव येथील रेल्वे स्थानकावर घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर विसरलेला सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीचा iPhone 15 Pro आरपीएफच्या दक्षतेमुळे सुरक्षितपणे संबंधित प्रवाशाच्या स्वाधीन करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव स्थानकावर नियमित गस्तीदरम्यान आरपीएफ पथकाच्या निदर्शनास प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर एक बेवारस मोबाईल आला. प्राथमिक पाहणीत तो अत्यंत महागडा iPhone 15 Pro असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी तातडीने मोबाईल ताब्यात घेत त्याच्या मालकाचा शोध सुरू केला. तपासणी, तांत्रिक पडताळणी आणि संपर्क प्रक्रियेनंतर संबंधित मोबाईल एका प्रवाशाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत संबंधित प्रवाशाशी संपर्क साधून त्याला स्थानकावर बोलावण्यात आले. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर १३ एप्रिल २०२५ रोजी हा महागडा मोबाईल त्याला सुखरूप परत करण्यात आला. आपला हरवलेला फोन पुन्हा मिळाल्याने प्रवाशाने आरपीएफ पथकाचे मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना प्रवासादरम्यान सामानाची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. स्थानकावर किंवा रेल्वेमध्ये चढताना-उतरताना आपले सामान तपासणे, तसेच मोबाईल, दागिने, लॅपटॉप यांसारख्या मौल्यवान वस्तूंवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच, कोणतेही सामान हरवल्यास त्वरित ‘Rail Madad’ पोर्टल किंवा आरपीएफ हेल्पलाईनच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. आरपीएफच्या या कार्यतत्परतेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

