(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील करंजाणी-दर्भाचीवाडी येथे ८१ वर्षीय वृद्ध महिलेचे झोपेतच निधन झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुलोचना श्रीपत साळवी या आपल्या राहत्या घरात निश्चल अवस्थेत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना नेहमीप्रमाणे हाक मारली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घराच्या पडवीलगत असलेल्या बेडरूममध्ये त्या अंगावर ब्लँकेट घेऊन पलंगावर उताण्या अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यांना हलवून उठविण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही हालचाल जाणवली नाही. यामुळे नातेवाईकांनी तातडीने खात्री केली असता त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर आवश्यक वैधानिक नोंद करण्यात आली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ३४/२०२६ अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद घेण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

