( नवी दिल्ली )
श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ इराणच्या युद्धनौकेवर झालेल्या अमेरिकन हल्ल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिकेच्या पाणबुडीने केलेल्या टॉर्पेडो हल्ल्यात इराणची IRIS Dena ही युद्धनौका बुडाली असून या घटनेत 87 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर भारताने आणखी एका इराणी युद्धनौकेला केरळमधील कोची बंदरात डॉकिंगची परवानगी दिली आहे.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, इराणने IRIS Lavan या युद्धनौकेला तांत्रिक अडचणींमुळे तातडीने बंदरात प्रवेश देण्याची विनंती भारताकडे केली होती. ही विनंती 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्राप्त झाली होती. त्यानंतर 1 मार्च रोजी भारताने कोची येथे डॉकिंगसाठी मंजुरी दिली. यानुसार IRIS Lavan ही युद्धनौका 4 मार्च रोजी कोची येथे दाखल झाली. सध्या ती भारतीय नौदलाच्या सुविधांमध्ये ठेवण्यात आली असून जहाजावर 183 कर्मचारी असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
श्रीलंकेजवळ हल्ला कसा झाला?
4 मार्च रोजी सकाळी श्रीलंकेतील गॅले शहरापासून सुमारे 40 नॉटिकल मैल अंतरावर हा हल्ला झाला. इराणची मॉडज-क्लास फ्रिगेट IRIS Dena ही युद्धनौका बहुराष्ट्रीय नौदल सराव MILAN मध्ये सहभागी झाल्यानंतर इराणकडे परतत होती. त्याचवेळी अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडो हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाला मोठे नुकसान झाले आणि अखेर ती समुद्रात बुडाली. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 87 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली आहे.
भारताच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
IRIS Dena वर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने IRIS Lavan ला कोची येथे डॉकिंगची परवानगी दिल्यामुळे या निर्णयाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे. सध्या या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी परिस्थितीवर भारत आणि इतर देश बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

