(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सह्याद्रीच्या कुशीत मुक्त संचारासाठी सोडलेल्या वाघांना आता कोकणच्या निसर्गाचीही भुरळ पडू लागली आहे. कोयना अभयारण्यात सोडण्यात आलेली ‘हिरकणी’ ही वाघीण तब्बल दोन महिने चिपळूण तालुक्याच्या पूर्व भागात वास्तव्यास होती. घनदाट जंगल, मुबलक भक्ष्य आणि निसर्गसंपन्न परिसरामुळे तिने कोकणातच आपला मुक्काम वाढविल्याचे चित्र होते. अखेर वन विभागाच्या विशेष प्रयत्नांनंतर तिने पुन्हा सह्याद्रीच्या दिशेने कूच केली असून, सध्या ती कोयना अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात स्थिरावली आहे.
सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तब्बल १ हजार १६५ चौ.कि.मी. परिसरात विस्तारलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि त्याचा बफर परिसर हा वन्यजीवांच्या मुक्त संचाराचा महत्त्वाचा मार्ग आहे. या परिसरातील वाघ अनेकदा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून घाट ओलांडून कोकणात दाखल होतात. कधी आंबा घाट, तर कधी कुंभार्ली घाटाच्या मार्गाने त्यांचा कोकणातील प्रवास घडतो. कोयना अभयारण्यात सोडण्यात आलेल्या ‘एसटीआर ०३’ अर्थात ‘बाजी’ या नर वाघासोबत ‘हिरकणी’लाही येथे आणण्यात आले होते. पेंच व्याघ्र प्रकल्पातून ‘पीटीआर १२३’ क्रमांकाची ही वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली. तिला शासनाकडून ‘एसटीआर ०६’ हा क्रमांक देण्यात आला, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी तिचे नामकरण ‘हिरकणी’ असे केले. सह्याद्रीच्या जंगलात वावर सुरू केल्यानंतर या वाघिणीने काही काळातच पश्चिमेकडे मोर्चा वळविला. पर्वतरांगा आणि घाटवाटा ओलांडत तिने थेट कोकणात प्रवेश केला. चिपळूण तालुक्याच्या पूर्व भागात तब्बल दोन महिने तिचा मुक्त संचार सुरू होता.
चिपळूण परिसरात वास्तव्यास असताना ‘हिरकणी’ने याच भागात शिकार केल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे कोकणातील जंगलात तिला भक्ष्य आणि अनुकूल अधिवास उपलब्ध झाल्याचे दिसून आले. सह्याद्रीच्या पलीकडे असलेला कोकणचा निसर्ग आणि जंगलातील उपलब्ध खाद्यसाखळी वाघांसाठी अनुकूल ठरत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. मात्र, वाघिणीचा मानवी वस्त्यांशी संपर्क वाढू नये तसेच तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाने तिला पुन्हा कोयना अभयारण्याच्या दिशेने वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक प्रयत्नांनंतर अखेर ‘हिरकणी’ने आपला मार्ग बदलला आणि पुन्हा सह्याद्रीच्या जंगलात परतली.
‘हिरकणी’च्या कोकणातील दोन महिन्यांच्या वास्तव्यानिमित्ताने सह्याद्री आणि कोकण यांच्यातील वन्यजीवांच्या नैसर्गिक भ्रमंतीचा मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घाटमार्ग, जंगलांचे सलग पट्टे आणि बफर क्षेत्रे ही वाघांसह अन्य वन्यजीवांच्या हालचालींसाठी महत्त्वाची ठरत आहेत. सह्याद्री ओलांडून कोकणात येणाऱ्या वाघांची ही भ्रमंती केवळ वन्यजीवांच्या अधिवासाची व्याप्ती दाखवणारी नाही, तर कोकणातील समृद्ध जैवविविधता आणि वनक्षेत्राची क्षमता अधोरेखित करणारी असल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

