( बुलढाणा )
भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे चार दिवसीय ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026’ आयोजित करण्यात आला आहे. औषधी वनस्पती लागवड, कृषी वनीकरण आणि आयुष औषध प्रणालींबाबत जनजागृती करणे, सर्वसमावेशक आरोग्य सेवा देणे आणि शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नाच्या संधी निर्माण करणे हा या महामेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
मेळाव्याचे उद्घाटन आज बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभ संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर पार पडणार असून यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मोफत आरोग्य तपासणी आणि आयुष उपचार
या राष्ट्रीय मेळाव्यात नागरिकांना आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा, होमिओपॅथी अशा विविध आयुष प्रणालींमधून मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधे मिळणार आहेत. तसेच आयुष क्षेत्रातील नामांकित औषधनिर्माण व वेलनेस कंपन्यांकडून नवीन संशोधन, गुणवत्ता मानके आणि उत्पादन पद्धतींचे सादरीकरण केले जाणार आहे. घरगुती उपचार आणि औषधी वनस्पतींवर आधारित विशेष प्रदर्शनही यामध्ये असणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आयुर्वेदिक शेतीवर विशेष भर
बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी वनीकरण आणि औषधी वनस्पती लागवड हा शाश्वत उत्पन्नाचा पर्याय म्हणून पुढे आणण्यात येत आहे. या अनुषंगाने 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता विसावा परिसरात “आयुर्वेदिक शेती, उत्पादन आणि विपणन” या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये औषधी पिकांची लागवड, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत औषधी वनस्पती लागवडीची क्षमता तपासावी आणि या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. औषधी शेतीमुळे शेतकऱ्यांना लाभदायी व शाश्वत उत्पन्न, तर नागरिकांना उच्च दर्जाचे नैसर्गिक उपचार पर्याय उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील नागरिक, शेतकरी, बचत गट, विद्यार्थी, आरोग्य स्वयंसेवक आणि आयुष क्षेत्रातील सर्व घटकांनी शेगाव येथे येऊन ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026’चा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

