(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज (मंगळवारी ६ जानेवारी) रोजी नववर्षातील पहिला अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साही,भक्तिमय वातावरणात अतिशय शांततेत व सुरळीत पार पाडला. नववर्षातील या पहिल्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाला घाटमाथ्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे ६० ते ७० हजार भाविकांनी स्वयंभू श्रींचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली.
या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवासाठी आलेल्या भाविकांनी सोमवारी रात्री साडेबारा वाजल्यापासूनच दर्शनासाठी दर्शन रांगांमध्ये आपल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीकडून श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी प्रारंभी गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. यावेळी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी दर्शन रांगांमध्ये अतिशय शिस्तबद्धपणे उभे राहून स्वयंभू श्रींचे मनोभावे व श्रद्धापूर्वक दर्शन घेतले.

अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवासाठी गणपतीपुळे संस्थानकडून दर्शन रांगांवर पाण्याची व्यवस्था तसेच लाईट व्यवस्था करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गणपतीपुळे परिसरात लाईट व्यवस्था तसेच हाय मॅक्स दिवे लावण्यात आले होते. तसेच येणाऱ्या भाविकांची वाहन पार्किंग व्यवस्था स्मशानभूमी येथील सागर दर्शन पार्किंगमध्ये अतिशय नियोजनबद्ध करण्यात आली.
या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १४ पोलीस अधिकारी आणि १४५ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी अतिशय चोख बजावली. यामध्ये मंदिर परिसर आणि विशेषत: समुद्र चौपाटीवर कुठलाही अपघात घडणार नाही या दृष्टीने पोलिसांनी विशेष गस्त घातली. त्याचबरोबर भाविकांच्या वाहनांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी आपली कामगिरी अतिशय चोख पार पाडली.
या अंगारकीला घाट माथ्यावरून कोल्हापूर, सांगली, सातारा, जत, इस्लामपूर, तासगाव, कराड, इचलकरंजी, कुरुंदवाड, बेळगाव, मिरज आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते. या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून एसटीच्या जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्ट रत्नागिरी यांच्या सदस्यांचे पोलिस यंत्रणेला विशेष सहकार्य लाभले. त
सेच भाविकांच्या आरोग्याच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यावर तात्काळ उपचार देण्यासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय मदत केंद्राने विशेष कामगिरी बजावली. यात्रोत्सवानिमित्ताने घाटमाथ्यावरील विविध गणेश मंडळांनी भाविकांसाठी खिचडी आणि महाप्रसादाचे वाटप केले. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
अंगारकी चतुर्थी यात्रा उत्सवानिमित्ताने घाटमाथ्यावरील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक दुकानदार दाखल झाले होते. यावेळी स्वयंभू श्रींच्या दर्शनाच्या निमित्ताने आलेल्या भाविकांनी यात्रा उत्सवामध्ये खरेदीचा देखील आनंद लुटल्याचे चित्र दिसून आले. या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी साडेचार वाजता गणपती मंदिराच्या प्रदीक्षणामार्गे स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मंगलमूर्ती मोरया चा जयघोष करून काढण्यात आली. या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर रात्री चंद्रोदयानंतर साडेदहा वाजता स्वयंभू श्रींचे मंदिर बंद करण्यात आले. एकूणच अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या भक्तीभावात व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी मोठी मेहनत घेतली.

