(रत्नागिरी / अमित कांबळे)
बुद्धविहार हे केवळ धार्मिक विधी करण्याचे ठिकाण नसून व्यक्तीच्या मानसिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाला दिशा देणारे संस्कार केंद्र आहे. बुद्धविहारांमध्ये पूजा-वंदनेसह धम्मअभ्यासाला प्राधान्य दिल्यास व्यक्तीची मानसिकता उंचावण्यास मदत होते, असे प्रतिपादन नामवंत पत्रकार आणि बौद्धाचार्य वैभव पवार यांनी केले.
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३८, तालुका शाखा बौद्धजन पंचायत समिती आणि संस्कार समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी संबोधी बुद्धविहार, कपिलवस्तूनगर, करबुडे येथे वर्षावास प्रवचनमालेतील कार्यक्रम धम्ममय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी बौद्धाचार्य वैभव पवार यांनी भगवान बुद्धांचा कार्यकारणभावाचा सिद्धांत, बुद्धविहारातील पूजाविधीचे महत्त्व तसेच सामाजिक, धार्मिक आणि मानसिक विकासातील बुद्धविहाराची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.
करबुडे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष संतोष कृष्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सचिव आणि बौद्धाचार्य रविकांत पवार गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संबोधी बुद्धविहाराच्या पटांगणात निळ्या पक्षीय आणि पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुद्धविहारातील तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना बौद्धजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष संतोष कृष्णा जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा रोशनी जाधव तसेच मुंबई मंडळाच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांनी अर्पणविधी केला.
पाली भाषा डिप्लोमा प्राप्त केल्याबद्दल विजय जाधव आणि अनामिका जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अनामिका जाधव यांनी पाली भाषेचे महत्त्व विशद केले. तसेच या भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
प्रवचनाची सुरुवात बौद्धाचार्य वैभव पवार यांनी धम्मगीत सादर करून केली. त्यानंतर त्यांनी भगवान बुद्धांचा कार्यकारणभावाचा सिद्धांत समजावून सांगितला. व्यक्तीच्या मानसिक विकासासाठी बुद्धविहारांमध्ये पूजा-वंदना आणि धम्मअभ्यास यांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारून लाखो लोकांना धम्मदीक्षा दिली. या ऐतिहासिक परिवर्तनामुळे समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक विकासाला नवी दिशा मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.
बौद्धजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी कपिलवस्तू बौद्धजन कमिटी, मुंबईचे अध्यक्ष नथुराम हिरू जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. बुद्धविहारांमध्ये धार्मिक अभ्यासासोबतच पाली भाषेचा अभ्यास नियमितपणे होणे आवश्यक आहे. त्यामुळे भगवान बुद्धांचे विचार, शिकवण आणि धम्माचे तत्त्वज्ञान अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवता येईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुंबई कमिटीचे सचिव सिद्धार्थ जाधव यांनी आभार मानले. वर्षावासाच्या काळात धम्मविषयक कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता स्पष्ट करताना अशा उपक्रमांकडे संकुचित दृष्टिकोनातून न पाहता त्यामागील व्यापक उद्देश समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी ‘हत्ती आणि आंधळे’ या रूपकाचा दाखला दिला. एखाद्या विषयाकडे अपुऱ्या माहितीच्या आधारे पाहिल्यास त्यातील संपूर्ण सत्य समजत नाही, हा संदेश त्यांनी या उदाहरणातून दिला.
या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पवार, संस्कार कमिटीचे अध्यक्ष विजय आयरे, सचिव सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे सचिव रविकांत पवार यांच्यासह विविध मान्यवर, मुंबई कमिटीचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या आणि धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्धाचार्य विश्वजीत जाधव आणि रविकांत पवार गुरुजी यांनी सरणत्तय गाथा म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
वर्षावास प्रवचनमालेच्या माध्यमातून धम्मविचारांचा प्रसार, पाली भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व आणि बुद्धविहारांची सामाजिक व धार्मिक भूमिका अधोरेखित झाली. धार्मिक उपक्रमांसोबतच धम्माचे तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


