(रत्नागिरी)
रत्नागिरी आणि परिसरातील तालुक्यांमध्ये सलग ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने हापूस आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. हवामानातील अचानक बदलामुळे झाडांवरील मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावण्याची तसेच मोहोराऐवजी पुन्हा पालवी येण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या तीव्र थंडीमुळे जिल्ह्यातील ३० टक्क्यांहून अधिक झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे हंगाम चांगला जाईल अशी बागायतदारांना आशा होती. मात्र मागील दोन दिवसांपासून आलेल्या ढगाळ हवामानामुळे त्यांचे गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. दापोलीत तापमान ८ ते ९ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेल्यानंतर आता वातावरणात पुन्हा उष्णता जाणवत असल्याने द्विधा स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे हापूसचे उत्पादन किमान एक महिना उशिरा येण्याची चिन्हे असून मोहोराऐवजी नवीन पालवी येण्याची शक्यता आहे. तसेच तुडतुड्या व इतर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. तर यामुळे बागायतदारांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च पडणार आहे. आरोग्यावरही या हवामान बदलाचा परिणाम दिसून येत असून सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार वाढत आहेत.
बागायतदारांनी आता हवामानातील बदलांवर सतत लक्ष ठेवण्याची आणि आवश्यक तेथे संरक्षणात्मक फवारणी करण्याची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

