(मुंबई)
‘मोंथा’ चक्रीवादळाने आपला प्रवास थांबवला असला, तरी अवकाळी पावसाने राज्यात चिंता वाढवली. मात्र, आता हा अवकाळी पाऊसही माघारी फिरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर थंडीची चाहूल लागणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात हिवाळ्याची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. ऑक्टोबर संपून नोव्हेंबर सुरू झाला तरीही थंडीचा पत्ता नसल्याने नागरिक संभ्रमात होते. दरम्यान, हवामान खात्याने आता पावसाचा माघारी फिरण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून, पाच नोव्हेंबरपासून थंडीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल, असे सांगितले आहे.
उकाडा आणि अवकाळी पाऊस निवळल्यानंतर राज्यात हळूहळू थंडी वाढू लागेल. नवरात्र आणि दिवाळी संपली, तुळशी विवाहही पार पडले, तरीही अनेक भागांत पावसाच्या सरी कायम होत्या. मात्र, हवामान खात्याच्या नव्या अंदाजामुळे दिलासा मिळाला आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील प्रणालींमुळे झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. तरी आता परिस्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. सहा ते आठ नोव्हेंबरदरम्यान हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. परंतु सहा नोव्हेंबरपासून पूर्ण राज्यात पाऊस कमी होऊन थंडीची सुरूवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

