(रत्नागिरी)
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी व चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी महिला सर्वसाधारण तर चिपळूण नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे.
यामुळे रत्नागिरीत आता नगराध्यक्ष पदावर महिला विराजमान होणार हे निश्चित झाले असून, इच्छुक पुरुष उमेदवारांची निराशा झाली आहे. तर चिपळूणमध्ये सर्वसाधारण आरक्षणामुळे सर्वपक्षीय स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
रत्नागिरीतून नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून शिल्पा सुर्वे, शितल पावसकर, उज्वला शेट्ये, शिल्पा पटवर्धन आणि वर्षा ढेकणे या नावांची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीकडून माजी नगराध्यक्ष मिलींद किर यांच्या पत्नी हिमानी मिलींद किर आणि दिलंशाद दिलावर गोदड या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा रंगू लागली आहे.
चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे रमेश कदम तर महायुतीकडून उमेश सकपाळ हे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत.
आरक्षण जाहीर होताच जिल्हाभर निवडणुकीच्या चर्चांना आणि तयारीला वेग आला असून, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये आता राजकीय धुळवड रंगणार आहे.

