(मुंबई)
राज्यातील काही आजी-माजी मंत्री आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप जोर धरत आहे. या प्रकरणात गोपनीय शासकीय कागदपत्रे हनीट्रॅपच्या माध्यमातून बाहेर पडत असल्याचेही संशय व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत या गंभीर आरोपांना उजाळा देत सरकारकडून यावर त्वरित स्पष्टीकरण आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हनीट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय माहितीचा गोरखधंदा?
नाना पटोले यांनी आरोप केला की, काही उच्चस्तरीय आयएएस अधिकारी आणि मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. यामुळे शासनातील संवेदनशील माहिती, गोपनीय कागदपत्रं आणि महत्त्वाच्या सरकारी कंत्राटांची माहिती बाहेर पडत असल्याची भीती व्यक्त केली गेली आहे. नाशिकपासून अकोल्यापर्यंत राज्यातील विविध विभागांमध्ये हनीट्रॅप प्रकरणाच्या आवाजात दबक्या चर्चा सुरू आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यासाठी आदेश देण्याची विनंती केली आहे.
विरोधकांच्या या गंभीर आरोपांनंतरही सरकारकडून तत्काळ कारवाई होण्याचे काही संकेत दिसत नाहीत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाला चौकशीची जबाबदारी सोपवली आहे, मात्र सध्या या प्रकरणात वेळ घालवण्याचा सूर दिसून येतोय. विरोधकांच्या मते, काही गुन्हेगारी टोळ्या सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून महत्त्वाची माहिती मिळवत असून, त्याचा गैरवापर करून सरकारी कंत्राटे आणि आर्थिक फायद्यासाठी गैरव्यवहार घडवत आहेत. त्यामुळे अशा गंभीर प्रकरणांची सखोल आणि तातडीने चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यातील या संवेदनशील प्रकरणावर शासनाने तत्परतेने उत्तर देणे आणि योग्य ती चौकशी सुरू करणे आवश्यक आहे, असा काँग्रेसचे नाना पटोले यांनी आग्रह धरला आहे.