( रत्नागिरी )
शहरातील प्रसिद्ध भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ रविवारी दुपारी एक अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात कोसळून बेपत्ता झाली. ही घटना सेल्फी घेताना अपघाताने घडली की आत्महत्येचा प्रयत्न होता, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
रविवारची सुट्टी असल्याने भगवती किल्ला परिसरात स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी होती. दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास २३ ते २५ वयोगटातील एक तरुणी रेलिंगच्या बाहेर जाऊन सेल्फी काढत होती. तिने आपली चप्पल आणि स्कार्फ बाजूला ठेवून सेल्फीमध्ये गुंग झाल्याचे सांगण्यात येते. काही क्षणातच ती सुमारे २०० ते २५० फूट खोल समुद्रात कोसळली. ही घटना घडताच परिसरातील पर्यटकांनी आरडाओरड केली आणि मोठी गर्दी झाली. तत्काळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत ती तरुणी समुद्रात दिसेनाशी झाली होती.

दरम्यान, रत्नदुर्ग माऊंटेनियर्स आणि एनडीआरएफचे चिपळूणहून दाखल झालेले पथक सायंकाळपर्यंत ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने शोधकार्य करत होते. फिशरीज विभागाच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन सुरू असून, अद्याप यश मिळालेले नाही. या घटनेचा पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहेत. हा अपघात आहे की आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, हे तपास पूर्ण झाल्यावरच समजू शकेल.
या सगळ्या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरीचे प्रांताधिकारी तहसीलदार सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन या सगळ्याची माहिती घेत यासंदर्भात युवतीची ओळख पटवून तपासाचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. दरम्यान, भगवती किल्ल्याकडे वरील बाजूस जाताना एका व्यक्तीने पाहिले त्यानंतर ही तरुणी तेथेच एका ठिकाणी बसल्याचेही पाहिले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.


