(रत्नागिरी)
बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून क्रिप्टो करन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीची तब्बल २४ लाख ८५ हजारांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अन्य दोघांना खेड पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील सुरतमधून अटक केली. यापूर्वी या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आलेली असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.
जिम्मीभाई सरनीलभाई भगत (४०, रा. सुरत, गुजरात), सोनू रामलाल टेलर (२४, रा. दिनोडली, सुरत, गुजरात) अशी आता अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. याबाबत फिर्यादीने खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १९ एप्रिल ते २४ मे या कालावधीत त्यांना एआरके लर्निंग ग्रुप या व्हॉटस्ॲप ग्रुपवरील ट्रेडिंगसंदर्भातील गोष्टी तसेच दोन मोबाईल क्रमांकांवरून येणाऱ्या व्हॉटस्अॅप मेसेजद्वारे संशयितांनी ‘एआरके इनव्हेस्टमेंट ग्रुप’ या कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवले.
त्यांच्या आमिषाला बळी पडत फिर्यादींनी आपल्याकडील २४ लाख ८५ हजार त्या कंपनीमध्ये गुंतवले होते; परंतु परतावा तसेच मूळ रक्कमही न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खेड पोलिस ठाण्यात ३ जून रोजी तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी यापूर्वी नीरज जांगरा आणि नारायणलाल जोशी या दोघांना अटक केली होती; परंतु त्यांचे साथीदार जिम्मीभाई भगत आणि सोनू टेलर हे फरार होते. पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेऊन अटक केली. त्यांनी अद्यापपर्यंत क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यांचा वापर करून त्यात पैसे घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच ॲप्लिकेशनचा वापर करुन मेसेज डायव्हर्ट करण्याबाबतही पोलिस अधिक तपास करत आहेत.
या गुन्ह्यात संशयितांकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर, हेड कॉन्स्टेबल दीपक गोरे, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा बांगर, वैभव ओहोळ, नीलेश शेलार, हेड कॉन्स्टेबल रमीज शेख आणि सायबरचे पोलिस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांनी केली आहे.