(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री प्रतिष्ठान वाटद खंडाळा, सर्व रामभक्त व श्री देव खंडाळेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ वाटद -खंडाळा मिरवणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २६ मार्च व शुक्रवार दिनांक २७ मार्च असे दोन दिवस श्रीरामनवमी उत्सव, श्री खंडाळेश्वर मंदिर खंडाळा येथे साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी प्रथम श्री राम प्रतिमा पूजन व श्री गणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री खंडाळेश्वर मंदिर ते नियोजीत नविन राम मंदिर ज्या जागेत उभारायचे तिथपर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा विशेष लक्षवेधी ठरली. त्या नंतर राम जन्म सोहळ्यानिमित्त आरती झाल्या. यावेळी सर्वांना तिर्थ प्रसाद देण्यात आला. त्यानंतर दुपारी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला तसेच रात्री भजनाचा कार्यक्रम संपन्न होऊन पहिल्या दिवसाच्या उत्सवाची सांगता झाली.
या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २७ मार्च रोजी रात्री जागतिक रंगभूमी दिनानिमित्त प्रथम नटराजाचे पुजन करण्यात आले. त्या नंतर वाटद पंचक्रोशीतील रंगकमींचा सत्कार करण्यात आल. त्यानंतर श्री प्रतिष्ठान खंडाळा यांच्या वतीने उत्सवामध्ये ज्या ज्या सर्वांनी सहभागी होऊन, ज्या दानशुर व्यक्तीनी सढळ हस्ते, रोख स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात मदत केली, त्या सर्वांचे जाहीर आभार मानण्यात आले.
या उत्सवानिमित्त रात्री श्री समर्थ कृपा प्रॉडक्शन रत्नगिरी यांचा कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा तुफान विनोदी लोकनाट्याचा , कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत साजरा झाला. या उत्सवाच्या दोन दिवसात सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. तसेच सर्व कार्यक्रमांचे नीटनेटके नियोजन करण्यात आले. या उत्सवासाठी श्री प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

