(राजापूर / तुषार पाचलकर)
समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे योगदान, पोलीस दलाचे शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी, तसेच समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे महत्त्व समजावे, या उद्देशाने रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कार्याची आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची माहिती व्हावी, यासाठी स्पर्धेत ‘समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे योगदान’, ‘पोलीस दल – समाजाचा खरा रक्षक’, ‘पोलीस दलाप्रती समाजाचे कर्तव्य आणि जबाबदारी’ तसेच ‘पोलीस दलाचे शौर्य, मानवता आणि कर्तव्यनिष्ठा’ हे विषय देण्यात आले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाविषयी आदरभाव निर्माण होण्यासोबतच सामाजिक सुरक्षितता, कायद्याचे पालन आणि नागरिकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली. यावेळी रायपाटण पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी रामदास पाटील आणि स्वप्नील घाटगे उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुंभार, सहाय्यक शिक्षक गौतम पांगरीकर, सिद्धांत सरफरे, सरिता कुरणे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी संदीप कोलते आणि सुरेश कांबळे यांनीही या उपक्रमाला उपस्थिती लावली.
पोलीस दलाचे शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी केले जाणारे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


