(दापोली /रत्नागिरी)
खेड येथील माहेरी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेली ३५ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना दापोली तालुक्यातील नानटे-जांभुळवाडी येथे घडली आहे. शिल्पा संदेश भेकरे असे या महिलेचे नाव असून, शोध घेऊनही त्या न सापडल्याने त्यांच्या सासू वैजयंती शिवाजी भेकरे (वय ५५) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणासंदर्भातील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा भेकरे या २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास नानटे-जांभुळवाडी येथील राहत्या घरातून खेड तालुक्यातील किंजळे-कळकराय येथे माहेरी जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या. त्या वेळी सायंकाळची वेळ असल्याने घराबाहेर जाऊ नये, असे त्यांच्या पतीने त्यांना सांगितले होते. मात्र, त्या घरातून निघून गेल्या. त्यानंतर त्या माहेरी पोहोचल्या आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या आईकडे चौकशी करण्यात आली. मात्र, शिल्पा घरी आल्या नसल्याचे त्यांच्या आईने सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी नानटे व परिसरात त्यांचा शोध घेतला; परंतु त्या आढळून आल्या नाहीत.
अखेर वैजयंती भेकरे यांनी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ७.१२ वाजता दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीत आहे. बेपत्ता महिलेचा शोध घेण्याबाबत पुढील तपास सुरू आहे.


