(कराड / वृत्तसंस्था)
सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावरील नव्याने वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या सात मित्रांच्या गाडीला रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की स्कॉर्पिओच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कातरखटाव येथील सात मित्र दसऱ्यानिमित्त कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते रात्री स्कॉर्पिओ गाडीतून आपल्या गावाकडे निघाले. कराड शहराजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांची गाडी पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. अपघाताची तीव्रता एवढी होती की स्कॉर्पिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि चार तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत तेजस देशमुख (वय २५), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, अपघाताच्या वेळी तेजस देशमुख स्कॉर्पिओ चालवत होता.
अपघातात ऋतुराज दुबळे (वय २१), शंतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात सहकार्य केले.
कराडजवळील हा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलावर झालेला हा पहिलाच मोठा आणि गंभीर अपघात असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने कातरखटाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


