(रत्नागिरी / वार्ताहर)
खेडशी येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाला काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुक्याच्या वतीने शालेय कामकाजाचा वेग व दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक असा कलर प्रिंटर भेट देण्यात आला.
आजच्या डिजिटल शिक्षण पद्धतीत आणि शालेय प्रशासनात कलर प्रिंटरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन, विविध शैक्षणिक प्रकल्प, रंगीत अभ्यास पत्रिका, आणि विद्यालयाची महत्त्वाची कागदपत्रे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने प्रिंट करणे शक्य होणार आहे.
हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभाग प्रमुख श्री. सचिन सावंत देसाई व युवासेना तालुका प्रमुख श्री. संदेश नारगुडे यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यालयातील एका साध्या आणि छोटेखानी कार्यक्रमात, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा रत्नागिरी तालुका समन्वयक श्री. शेखर घोसाळे यांच्या हस्ते हा कलर प्रिंटर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर व इतर कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. सचिन सावंतदेसाई, श्री संदेश नारगुडे, महिला विभाग प्रमुख सौ. ज्योती मोरे, माजी सरपंच सौ. जान्हवी घाणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. स्मिताली नार्वेकर तसेच सिनियर जर्नलिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा सौ. मेधा कुलकर्णी या मान्यवरांसह विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल विद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले.


