(संगमेश्वर/ वार्ताहर)
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाने अवघ्या सहा महिन्यांत सुमारे ३.५ कोटी रुपयांचे, तर गणेशोत्सवाच्या काळात तब्बल ९५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. स्थानकाला मिळणारा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि त्यातून मिळणारे लक्षणीय उत्पन्न लक्षात घेता, येथे आणखी रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, चार महत्त्वाच्या साप्ताहिक एक्स्प्रेसना अद्याप या स्थानकावर थांबा मिळालेला नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या चारही एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शेखर निकम, आमदार प्रमोद जठार, पद्मश्री दादा इदाते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनीही पत्रव्यवहार केला आहे. तसेच, पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा विषय मांडला होता.
संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी असलेल्या चार एक्स्प्रेसमध्ये बांद्रा–मडगाव एक्स्प्रेस (१०११५/१०११६), श्री गंगानगर–तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस (१६३११/१६३१२), अजमेर–एर्नाकुलम मरुसागर एक्स्प्रेस (१२९७७/१२९७८) आणि जबलपूर–कोईम्बतूर एक्स्प्रेस (०२१९७/०२१९८) यांचा समावेश आहे.
संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या, मिळणारे उत्पन्न आणि परिसरातील नागरिकांची वाहतुकीची गरज लक्षात घेता, या चारही एक्स्प्रेसना थांबा देणे आवश्यक असल्याची भूमिका प्रवाशांकडून मांडली जात आहे. कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या स्थानकावर महत्त्वाच्या एक्स्प्रेसना थांबा मिळत नसल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार एक्स्प्रेसना थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, असा विश्वास निसर्गरम्य चिपळूण/संगमेश्वर ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केला आहे.
आता रेल्वे बोर्ड या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.


